तारापूर एमआयडीसीतील मोहिनी ऑर्गेनिक केमिकल कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली.
पालघर- तारापूर एमआयडीसीतील मोहिनी ऑर्गेनिक केमिकल कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली.
कंपनीतील केमिकलच्या साठय़ामुळे ही आग काही काळातच पसरली आणि बाजूच्या ललिता केम व बोईसर केमिकल या कंपन्याही आगीत सापडून भस्मसात झाल्या. या घटनेत बोईसर केमिकल कंपनीतील ६ कामगार भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या आगीची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसी, पालघर नगरपरिषद, तारापूर अणूप्रकल्प, वसई-विरार महापालिका, डहाणू औष्णिक वीज प्रकल्प या अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पाणीकपातीमुळे त्यांना पाणी कमी पडले आणि आग विझवण्यात अडथळे आले.
सायंकाळी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. यात कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कंपन्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त केमिकलसाठा असल्याचे यानंतर बोलले जात आहे.