फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गटवार (ब गट) साखळीमध्ये गुरुवारी माली, पॅराग्वे संघांनी अंतिम १६ संघात स्थान मिळवले.
नवी दिल्ली / नवी मुंबई- फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गटवार (ब गट) साखळीमध्ये गुरुवारी माली, पॅराग्वे संघांनी अंतिम १६ संघात स्थान मिळवले. गटवार साखळीतील शेवटच्या लढतीत मालीने न्यूझीलंडला ३-१अशा फरकाने हरवले. नवी मुंबईत पॅराग्वेने तुर्की संघावर त्याच फरकाने विजय मिळवला. पॅराग्वेने गटातील तिन्ही लढती जिंकण्याची करामत साधली.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ‘ब’ गटात मालीने न्यूझीलंडला ३-१ असे हरवले. सॅलॅम (१८व्या मिनिटाला), जेमॉसा (५०व्या मिनिटाला) आणि डिआएने (८२व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाचे योगदान दिले. न्यूझीलंडतर्फे एकमेव गोल स्प्रॅगने ७२व्या मिनिटाला केला. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने मालीने आगेकूच केली. तीन सामन्यांमधील हा त्यांचा दुसरा विजय आहे. परॉग्वेविरुद्धच्या पराभवातून बोध घेत त्यांनी खेळ उंचावला.
डॉॅ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या ‘ब’ गटातील अन्य लढतीत पॅराग्वेने तुर्कीवर त्याच फरकाने (३-१) मात केली. बोगॅडो (४१व्या मिनिटाला), कॅडरेझो (४३व्या मिनिटाला) आणि गॅलियानोने (६१व्या मिनिटाला) गोल करत पॅराग्वेचा विजय सुकर केला. तुर्कीला एक गोल करता आला. ‘इंज्युरी टाईम’मध्ये क्रीमने संघाचे खाते उघडले. माली (३-२), न्यूझीलंड (४-२) आणि तुर्कीवर (३-१) सहज मात करताना १० गोल केले तरी पाच खाल्लेत. मात्र विजयाच्या हॅट्ट्रिकसह त्यांनी गटात अव्वल स्थान राखले. ‘ब’ गटात तिस-या आणि चौथ्या स्थानी राहिलेल्या न्यूझीलंड आणि तुर्कीचे आव्हान संपुष्टात आले. त्यांना तीन सामन्यांत एकही विजय नोंदवता आला नाही.
[EPSB]
[/EPSB]