ब्लू व्हेल गेमच्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश सोशल नेटवर्किंग साईटसला केंद्र सरकारने दिले आहेत.
नवी दिल्ली- ब्लू व्हेल गेममुळे देशात आत्महत्या होत असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. त्यामुळे या गेमच्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने फेसबुक, गूगल, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सला दिले आहेत.
या गेमची आणि त्याच्याशी संबंधित सर्व लिंक तातडीने हटवण्यात याव्यात, असे पत्रकच केंद्र सरकारने सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सना पाठवले आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या सूचनेनंतर हे पत्रक पाठवण्यात आले आहे.
ब्लू व्हेल चॅलेंज या आत्महत्येस प्रवृत्त करणा-या गेमवर बंदी घालण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. राज्यातील विधानसभेपासून ते दिल्लीत संसदेपर्यंत या गेमवर बंदीची मागणी करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात मुंबईतील एका अल्पवयीन मुलाने ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मनप्रीत सहानी याने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मनप्रीत हा ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता.
यानंतर इंदौरमध्येही याच गेममुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर सोलापूरचा एक मुलगा या गेममधील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी पूण्यात पोहोचला होता. पश्चिम बंगालमध्येही या गेममुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मुंबईतही अंधेरी परिसरात एका विद्यार्थ्याला आत्महत्या करत असताना प्रसंगावधान राखून त्याला वाचवण्यात आले. अशा घटना वारंवार वाढू लागल्याने सर्वांनीच चिंता व्यक्त केली आहे.