आता सध्या फेसबूकवर ‘साराहाह’ हे नवे अॅप प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
मुंबई- सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक नवनवीन अॅप युझर्सचे लक्ष वेधून घेत असतात. आता फेसबूकवर ‘साराहाह’ हे नवे अॅप प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या अॅपद्वारे व्यक्ती स्वतःची ओळख लपवून कोणालाही संदेश पाठवू शकते.
जेमतेम ५ एमबी फाइल साईझचे हे छोटेखानी अॅप सौदी अरेबियातील जैनुल आबेदीन याने विकसित केले आहे. त्याने अॅपला ‘साराहाह’ हे अरबी नाव दिले आहे. या अरबी नावाचा अर्थ प्रामाणिकपणा असा आहे. अॅपची नोंदणी अमेरिकेतील डेन्वर कोलॅरॅडोमधील एका कंपनीमार्फत झाली आहे.
सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसात ‘साराहाह’च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता. यातून प्रत्येक व्यक्ती आपल्यात सुधारणा करुन अधिकाधिक चांगली होण्याचा प्रयत्न करू शकते, असा एक चांगला विचार करुन हे अॅप तयार करण्यात आले आहे.
कसे आहे हे साराहाह अॅप?
- गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन ‘साराहाह’ हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
- आयओएससाठी ‘साराहाह’ची २२ एमबीची, तर अँड्रॉईडसाठी १२ एमबीची फाईल आहे.
- अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला साईन इन करावे लागेल.
- तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही.
- तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणा-या व्यक्तीचे नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची खासियत आहे.
- तुम्हाला संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर एक मेसेज बॉक्स दिसेल. तुम्ही त्यावर तुमचे उत्तर लिहून पाठवू शकता.
गुन्हे वाढण्याची शक्यता
साराहाह अॅपमुळे गुन्हे वाढण्याचा धोका सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. संदेश पाठवताना स्वतःची ओळख लपवता येत असल्यामुळे एखादी व्यक्ती धमकावण्यासाठी साराहाह अॅपचा वापर करू शकते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती साराहाह अॅपचा गुन्ह्यांसाठी वापर करण्याची शक्यता वाढली असल्याचे सायबर तज्ज्ञ सांगत आहेत.