सोलापुरातील कापड गिरण्या व सूतगिरण्या एका पाठोपाठ बंद पडल्यानंतर आता यंत्रमाग उद्योगापुरती सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे अस्तित्व कसेबसे शिल्लक राहिले आहे.
सोलापूर- सोलापुरातील कापड गिरण्या व सूतगिरण्या एका पाठोपाठ बंद पडल्यानंतर आता यंत्रमाग उद्योगापुरती सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे अस्तित्व कसेबसे शिल्लक राहिले आहे. या वस्त्रोद्योगातही अशांतता निर्माण झाली आहे. कामगार भविष्य निर्वाह निधी योजनेच्या लाभापासून ४२ हजारांपेक्षा अधिक असंघटित कामगार अद्यापि वंचितच आहेत. कामगार भविष्य निर्वाह निधी योजनेची अंमलबजावणी करताना त्यापासून यंत्रमाग कामगारांना कायद्याने दूर ठेवता येणार नाही. तर यंत्रमाग उद्योजक त्यास अजिबात राजी नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात यंत्रमाग उद्योजक व कामगार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.
यंत्रमाग उद्योगाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध सोलापुरी चादर व टेरी टॉवेलचे उत्पादन घेतले जाते. सोलापुरी चादरीला ब्रॅण्डनेम कायम आहे, तर दुसरीकडे येथील टेरी टॉवेलला परदेशात मागणी वाढते आहे. ही जमेची भक्कम बाजू असताना दुर्दैवाने कालानुरूप बदल न स्वीकारता पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने येथील यंत्रमाग उद्योगाची मोठी घसरण सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यामुळे यंत्रमाग उद्योगाला प्रमुख आधार मिळतो, त्या सोलापुरी चादरीचे उत्पादन झपाटय़ाने कमी होत असून सद्य:स्थितीत जेमतेम २० टक्के एवढेच सोलापुरी चादरीचे उत्पादन सोलापुरात घेतले जाते. उर्वरित चादरीचे उत्पादन हरियाणा, तामिळनाडू आदी प्रांतात मोठय़ा प्रमाणात होते. आश्चर्य म्हणजे परप्रांतात तयार होऊन आलेल्या चादरी सोलापुरी चादर म्हणून विकल्या जातात. ही स्थिती पाहता सध्या टॉवेल उत्पादनावर सोलापुरातील यंत्रमाग उद्योग तग धरून आहे. शहराच्या पूर्वभागात पद्मशाली विणकर समाजात यंत्रमाग उद्योगाची परंपरा आहे.
गरीब विणकर या नावाखाली पद्मशाली समाजाच्या धुरिणांसह उद्योजकांनी शासनाकडून हव्या तेवढय़ा सवलती लाटल्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय श्रम मंत्रालयाने कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळण्याबाबतचे आदेश गतवर्षी जारी केले. त्या अनुषंगाने गेल्या जानेवारीपासून सोलापुरातील कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त हेमंत तिरपुडे यांनी या आदेशाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने यंत्रमाग उद्योजकांशी संवाद साधत आपल्या परीने प्रयत्न चालविले. तब्बल सहा महिने संवाद साधल्यानंतरही यंत्रमाग उद्योजक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कामगार भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त तिरपुडे यांनी हे काम हाती घेतलेअसता त्यास कडाडून विरोध करीत यंत्रमाग उद्योग संघाने गेल्या महिन्यात आंदोलन हाती घेतले होते.
[EPSB]
[/EPSB]