मुंबई महापालिका क्षेत्रातून डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वाहून नेणा-या गाडया आणि कच-याच्या वजनाबाबत पारदर्शकता जपण्यासाठी अत्याधुनिक संनियंत्रण यंत्रणा देवनारमध्ये कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
मुंबई- मुंबई महापालिका क्षेत्रातून डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वाहून नेणा-या गाडया आणि कच-याच्या वजनाबाबत पारदर्शकता जपण्यासाठी अत्याधुनिक संनियंत्रण यंत्रणा देवनारमध्ये कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. यामध्ये प्रत्येक वाहनाचे वजन, पुढील आणि मागील नंबरप्लेटचे छायाचित्र, वाहनाची येण्याची आणि जाण्याची वेळ संगणकीय पद्धतीने नोंदवली जाणार आहे.
पालिकेच्या स्थायी समितीसह सभागृहात डम्पिंगविषयी रान पेटल्यानंतर प्रशासनाने याबाबत पाऊल उचलले आहे. विशेषत: जमा केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यापासूनच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र सत्ताधारी वर्गासह महापालिका प्रशासनही कंत्राटदारांना अभय देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मागील वर्षभरापासून डम्पिंगवरील कच-याच्या वहनाबाबत पालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे. याचाच परिणाम म्हणून महापालिकेने डम्पिंगवर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
कचरा संकलन आणि वाहतूक करणा-या कंत्राटदारांची देयके अदा करताना, ती प्राप्त माहितीच्या आधारे तपासून घ्यावीत आणि त्यानुसारच देयकांबाबत सुयोग्य रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवनारच्या धर्तीवर मुलुंड आणि कांजूरमार्ग येथेही लवकरच अत्याधुनिक संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.
डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वाहून नेणा-या गाडया आणि कचऱ्यांच्या वजनाबाबत पारदर्शकता जपण्यासाठी अत्याधुनिक संनियंत्रण यंत्रणा देवनारवर कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार, क्षेपणभूमीवर येणा-या तसेच क्षेपणभूमीतून बाहेर जाणा-या प्रत्येक वाहनाचे वजन, वाहनाच्या पुढील आणि मागील नंबरप्लेटचे छायाचित्र, वाहन येण्याची व जाण्याची वेळ संगणकीय पद्धतीने नोंदविली जात आहे.
या संगणकीय नोंदीची तपासणी करूनच कचरा वाहून आणण्यासाठी कंत्राटदाराला अदा केल्या जाणा-या देयकांची रक्कम देण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्याचबरोबर सर्व माहिती संकेतस्थळाद्वारे जनतेलाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे.