देवनार कचरा भराव भूमीत (डंपिंग) सुरक्षेसाठी उंच टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मुंबई- देवनार कचरा भराव भूमीत (डंपिंग) सुरक्षेसाठी उंच टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कचरा भराव भूमीतील अंतर्गत हालचालींवर सुरक्षारक्षकांमार्फत देखरेख ठेवण्यासाठी टेहळणी मनोरे उभारण्याचा निर्देश न्यायालयाने सात वर्षापूर्वी दिला होता. त्यानंतर आता प्रशासनाने झोपेतून जागे होत भराव भूमीत ११ उंच टेहळणी मनोरे बांधण्याचे कंत्राट दिले आहे.
गेल्या काही वर्षापासून देवनार कचरा भराव भूमी प्रकरण चांगलेच गाजत आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात इथे आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. यामधून निघणा-या धुराने वातावरण प्रदूषित होत आहे. या आगी लागण्याचे प्रकार तसेच वाढती दरुगधीची समस्येमुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याच्या चौकशीसाठी उपायुक्तांची समिती गठीत गेली होती. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधून येथील कचरामाफियांकडूनच आग लावण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्याची चौकशी पोलीस उपायुक्तांकडून केली होती. त्यानंतर अनेक कचरामाफियांना पोलिसांनी अटक केली होते.
दरम्यान, स्थायी समितीच्या सदस्यांसह सर्व कचरा भराव भूमींची पाहणी केल्यानंतर खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी देवनार कचरा भराव भूमीतील १५० खासगी सुरक्षा, संरक्षक भिंतीची बांधणी, आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहिरींचे बांधकाम, सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, तसेच सुरक्षारक्षकांसाठी टेहळणी मनोरे बसवण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यात आली होती. परंतु उंच मनोरे बांधण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर महापालिका आयुक्तांनी भराव भूमीत ११ ठिकाणी टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय घेत कंत्राटदारांची निवडही केली आहे.
देवनार कचरा भराव भूमीच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देत पाच सदस्यीस सर्वेक्षण तथा देखरेख समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ यांची देवनारच्या सुरक्षेकरता नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल २०१६मध्ये त्यांनी महापालिकेला देवनार कचरा भराव भूमीत सुरक्षारक्षकांना कायम अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवता यावे म्हणून टेहळणी मनोरे बांधावे असे सूचित केले.
त्यानुसार जोशी कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक करत २४० मीटर अंतराने ११ उंच मनोरे बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार या कामासाठी अनास इन्फ्रा या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी ८५ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.