राज्यभरातील निवासी डॉक्टरांवरील कामाचे ओझे दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारने हा भार हलका करण्यासाठी दिलेले आश्वासन हवेत विरले आहे.
मुंबई- राज्यभरातील निवासी डॉक्टरांवरील कामाचे ओझे दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारने हा भार हलका करण्यासाठी दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. आज ‘डॉक्टर दिन’ सर्वत्र साजरा होत जीवनदाते डॉक्टर न्यायासाठी प्रतीक्षेत आहेत.
महापालिका रुग्णालयात रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर नसल्याने इतर डॉक्टरांवर कामाचा भार पडत आहे. दिवसाला १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करत राहिल्याने डॉक्टरांवरील ताणतणाव वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्स डॉक्टर्स’ (मार्ड)ने ‘डॉक्टर दिना’चे निमित्त साधून महापालिकेच्या केईएम, नायर, शीव व जे. जे. या चार वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण ८०० निवासी डॉक्टरांचे सर्वेक्षण केले होते. यात ६८ टक्के डॉक्टरांनी कामाचा अतिताण येत असल्याचे म्हटले आहे. तर २० टक्के डॉक्टर १८ तासांपेक्षा जास्त काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
निवासी डॉक्टरांना या सर्वेक्षणात काही प्रश्न विचारण्यात आले. या रुग्णालयात काही अनपेक्षित घडल्यास अस्वस्थ वाटते का? अशी विचारणा केली असता २०८ डॉक्टरांनी प्रामाणिकपणे होकारार्थी उत्तर दिले. किती जणांना घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते असे वाटते? त्यावर २०४ जणांनी होकार दिला आहे. तर तणावाखाली काम करावे लागत असल्याचे ४२६ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, निवासी डॉक्टरांना आठवडाभरात ४८ तास डय़ुटी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरही महापालिका व सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना दिवसाला १२ तासांपेक्षा जास्त काम करावे लागत असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.
डॉक्टरही एक माणूसच
महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना किमान सात तास डय़ुटी करणे बंधनकारक आहे. मात्र पालिका रुग्णालयांतील डॉक्टर अतिरिक्त तास काम करत आहेत. रात्रपाळीत निवासी डॉक्टरांच्या तुटवडयामुळे इतर डॉक्टरांना जादा काम करावे लागते आहे. कामाच्या अतिताणामुळे डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
डॉक्टरही माणूसच आहे. स्वत:चा विचार न करता ते प्रथम रुग्णसेवेला महत्त्व देतात. त्यानंतरही डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कामाचा अतिताण, त्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणा-या मारहाणीची भीती. अशा वातावरण डॉक्टर सेवा पुरवत असतात. त्यांनाही विश्रांतीची गरज आहे.
– डॉ. सागर मुंदडा, अध्यक्ष केंद्रीय मार्ड
» ६८ टक्के डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण
» २० टक्के निवासी डॉक्टरांना
» १८ तासांपेक्षा अधिक काम
» अपु-या झोपेमुळे १९८ डॉक्टर त्रस्त
» ९६ डॉक्टर मानसिक तणावाखाली
» दोन महिन्यांत ३१ डॉक्टरांनी केला आत्महत्येचा विचार