दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना सोमवार अलिबाग सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, तर याच प्रकरणातील तीन महिला आरोपींना प्रत्येकी १० वर्ष सक्तमजुरीची तर दोन सोनारांनी प्रत्येकी नऊ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
अलिबाग- दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना सोमवार अलिबाग सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, तर याच प्रकरणातील तीन महिला आरोपींना प्रत्येकी १० वर्ष सक्तमजुरीची तर दोन सोनारांनी प्रत्येकी नऊ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष मोक्का न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी हा निकाल दिला.
गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणी या दहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने शिक्षा सुनावली नव्हती. त्यामुळे सोमवारी सकाळी १२ वाजल्यापासून विशेष मोक्का न्यायालयासमोर अंतिम निकालासाठी सुनावणी सुरू झाली. सकाळच्या सत्रात बचावपक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली. आरोपींचे वर्तन आणि वय लक्षात घेऊन कमीतकमी शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकील प्रसाद पाटील यांनी तो खोडून काढला व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर दुपारी साडेतीनला अंतिम निकाल जाहीर केला जाईल, असे न्यायाधीश पेठकर यांनी जाहीर केले.
संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास न्यायाधिशांनी आपला अंतिम निकाल जाहीर केला. दरोडा टाकणा-या नवनाथ विक्रम भोसले, कैलास विक्रम भोसले, छोटय़ा उर्फ सतीश जैनू काळे, विजय उर्फ विज्या बिज्या काळे, आणि ज्ञानेश्वर विक्रम भोसले या पाच मुख्य आरोपींना न्यायालयाने आजन्म कारावसाची शिक्षा सुनावली. तर दरोडय़ाच्या कटात सहभागी असणा-या खैराबाई विक्रम भोसले, कविता उर्फ कणी राजू काळे व सुलभा शांताराम काळे या तीन महिलांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पुरावे नष्ट करण्यास मदत करणा-या आनंद अनिल रायमोकर आणि अजित अरुण डहाळे या सोनारांना न्यायालयाने ९ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
तपासात जप्त करण्यात आलेले सोने मंदीर व्यवस्थापन समितीला न देता शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारी वकील म्हणून अॅड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले, तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. मानसी म्हात्रे, डंगर, महेश गुंजाळ आणि व्यवहारे यांनी कामकाज पाहिले.+
[EPSB]
[/EPSB]