लंडनमध्ये राहणा-या एका महिलेने सेलमधून २०० रुपयांची अंगठी खरेदी केली. पण ही दोनशे रुपयाची अंगठी ख-या हि-याची आहे हे ३७ वर्षानंतर या महिलेच्या लक्षात आले.
लंडन- महिलांना दागिन्यांची प्रचंड आवड असते. त्यामुळे त्या बाजारात खरे काय आणि खोटे काय दागिने सतत खरेदी करत असतात. पण हे बाजारातील खोटे दागिने खरे निघाले तर काय होईल. लंडनमध्ये राहणा-या एका महिलेने सेलमधून २०० रुपयांची अंगठी खरेदी केली. पण ही दोनशे रुपयाची अंगठी ख-या हि-याची आहे हे ३७ वर्षानंतर या महिलेच्या लक्षात आले.
या महिलेने तब्बल ३७ वर्षे ही अंगठी वापरली. एक दिवस अचानक आपण घालत असलेली अंगठी साधी नसून ख-या ही-याची असल्याचे तिला कळाले. मात्र इतक्या कमी किंमतीला घेतलेली अंगठी ख-या हि-याची असेल यावर तिचा विश्वासच बसेना. मग खात्री कऱण्यासाठी ती सोनाराकडे गेली आणि अंगठीत खरंच २६ कॅरेटचा हीरा असल्याचे समजल्याने ती चकीत झाली.
इतकी किंमती अंगठी विकल्यास किती पैसे येतील याचा अंदाजही या महिलेला नव्हता. त्यामुळे तिने दागिन्यांचा लिलाव करणा-या एका संस्थेशी संपर्क केला. संस्थेमध्ये ही अंगठी विकण्यासाठी लिलाव जाहीर झाला आणि अंगठी खरेदी करण्यासाठी बोली लावण्यात आली. या २०० रुपयाच्या अंगठीची किंमत तब्बल पाच कोटी ४६ लाखपर्यंत पोहोचली.
ही अंगठी विकण्यात आली त्यावेळी त्या हि-याला जुन्या पद्धतीने आकार देण्यात आला होता. अंगठी घेतली तेव्हा त्याची ओळख पटू शकली नाही कारण हि-यामध्ये पडणा-या प्रकाशाच्या परावर्तनामुळे हि-याची पारख केली जाते. मात्र जुन्या पद्धतीने घडविण्यात आलेल्या या हि-यातून प्रकाश परावर्तित होत नव्हता. मात्र सोनाराने ही अंगठी तपासली आणि तो हिरा असल्याचे सांगितले.