ठाणे जिल्हा ग्रामीण शालेय आणि महाविद्यालयीन डॉजबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये धामणगाव आणि मुलींमध्ये मोडकसागर मनपा शाळेने जेतेपद पटकावले.
वासिंद- ठाणे जिल्हा ग्रामीण शालेय आणि महाविद्यालयीन डॉजबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये धामणगाव आणि मुलींमध्ये मोडकसागर मनपा शाळेने जेतेपद पटकावले. जिंदल विद्यामंदिरामध्ये (वासिंद) झालेल्या स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात मुलांमध्ये महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय आणि मुलींमध्ये ग. वि. खाडे महाविद्यालयाने बाजी मारली.
१७ वर्षाखालील गटात मुले अंतिम फेरीत धामणगाव मनपा शाळेविरुद्ध माध्यमिक विद्यालय, नांदकर-सांगे शाळेने सुरुवातीला आघाडी घेतली. मात्र पुढील दोन सेट जिंकून धामणगाव शाळेने जेतेपदावर मोहोर उमटवली. प्रदीप धिंडे, सागर भामरे, नयन केणेने विजयात मोलाचे योगदान दिले.
प्रतिस्पर्धी संघातर्फे ललेश पाटील, इलियाज खान आणि ऋतिक पाटीलने कडवी झुंज दिली.
मुलींच्या गटात मोडकसागर शाळेने धामणगाव मनपा शाळेला सहज हरवले. मोडकसागरच्या नीता माढे, चिऊ शेंडे आणि गीता दिवाने अचूक मारा केला. १९ वर्षाखालील गटात (मुले) भिवंडीच्या चौघुले कनिष्ठ महाविद्यालयाने शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयावर मात करताना विजयी परंपरा कायम राखली. चौघुले कॉलेजतर्फे अमित पाटील, पंकज यादव, धीरज मुकादमने आक्रमक खेळ करताना विजयाला हातभार लावला. मुलींमध्ये खाडे कॉलेजच्या संघाने चौघुले महाविद्यालयाचा सहज पराभव केला. मयुरी वेखंडे, दिव्या मोरे आणि स्वप्नाली वेखंडेने सवरेत्कृष्ट खेळ केला.
या स्पर्धेत पंच म्हणून दिलीप अहिनवे, अनिल पाटील, निशान गायकवाड, उत्तम यादव, दीपक जगदाळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभांगी चौधरी, जयराम भुतांबरे, जयराम पाटील, नितीन वरकुटे, विठ्ठल दिवेकर, शरद विशे, नितीन जाधव तसेच जिंदल कॉलेजच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
[EPSB]
[/EPSB]