हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली असून यामध्ये धक्कादायक गोष्टीसमोर येत आहेत.
लखनऊ- हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली असून यामध्ये धक्कादायक गोष्टीसमोर येत आहेत. १४ मृतदेह कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय व मृत्यूच्या दाखल्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाला संशोधनासाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली.
बाबा रामरहीमच्या काळ्या कारनाम्याच्या एकापेक्षा एक धक्कादायक कथा दिवसेंदिवस समोर येत आहेत. रामरहीमचा सिरसा येथील ‘डेरा’ हा गूढ, गुपित आणि रहस्यांचा डेरा बनला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका समितीने लखनऊमधील जीसीआरजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची तपासणी केली होती. त्यातून ही बाब समोर आली. रामरहीमच्या डे-यातून जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत १४ मृतदेह दान करण्यात आले. मात्र, त्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नव्हती.
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी मृतदेहांची आवश्यकता असते. तर, बेवारस मृतदेहाचे शवविच्छेदन करणे आवश्यक असते. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयालाही पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. डेराकडून आलेल्या मृतदेहांच्या बाबतीत अशी कोणतीही प्रक्रिया पार पाडण्यात आली नव्हती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या चौकशी समितीने १९ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश सरकारला या प्रकाराची माहिती दिली असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या हाती आले आहे. यात कोणत्याही कागदपत्रांशिवाय मृत्यू प्रमाणपत्र नसताना मृतदेह स्वीकारणे गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.