थंडीच्या मोसमात दिल्लीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने थंडीचा कडाका वाढला.
नवी दिल्ली- नवी दिल्ली येथील नागरिकांची शनिवारची सकाळ पावसाने झाली. थंडीच्या मोसमात दिल्लीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने थंडीचा कडाका वाढला. पावसामुळे रेल्वे आणि विमान वाहतूकीवरही परिणाम झाला.
दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवार रात्रीपासूनच ढगाळ वातावरण होते. शनिवारी सकाळी अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. दिल्लीसह गुडगाव, गाजियाबाद, नोएडा, फरीदाबाद, मेरठ या परिसरात पावसाला सुरूवात झाली. रविवारीदेखील पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसामुळे रेल्वे आणि विमान वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. ७० रेल्वे गाड्या उशिराने सुरू आहेत तर सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. १६ गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे विमान वाहतूकीतही बदल करण्यात आला आहे.