खंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ठाणे- खंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे, फोन टॅप होईल या भीतीने दाऊदने गेल्या तीन वर्षांपासून भारतात फोन केलेला नाही, असे इक्बालने सांगितले.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिल्डरांकडून खंडणी उकळल्याच्या तक्रारीवरून इक्बाल कासकरला तीन साथीदारांसह भायखळा येथून अटक केली. त्याची कसून चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान खंडणीखोरीचे अनेक पुरावे हाती लागले आहेत. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दाऊदबद्दलही महत्त्वाची माहिती मिळली. मात्र अनेक प्रश्नांना इकबाल नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी त्याला प्रश्न विचारून महत्त्वाची माहिती मिळवली. दाऊद पाकिस्तानात असून तो कराचीत आहे. दाऊदचे लॅटिन अमेरिकेतील ड्रग माफियांशी कनेक्शन आहे. तसेच दाऊदच्या चार ते पाच ठिकाणांची माहिती इक्बालने चौकशीदरम्यान दिली.
दाऊदशी संपर्क होतो का, असे विचारले असता ‘गेल्या तीन वर्षात दाऊदने कधीही आपले कुटुंबीय वा एजंटना फोन केलेला नाही. आपला फोन टॅप होईल अशी भीती त्याला आहे,’ असे इक्बालने सांगितले. ठाण्यातील खंडणी वसुली प्रकरणात दाऊदचा काहीही संबंध नाही, असा दावा इक्बालने केला आहे.