बंगळुरूमधील उपनगरातील इजीपुरा येथे सिलिंडरचा स्फोट होऊन रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे ७ जण ठार झाले. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास घडली.
बेंगळुरू- बंगळुरूमधील उपनगरातील इजीपुरा येथे सिलिंडरचा स्फोट होऊन रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे ७ जण ठार झाले. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत एक तीन वर्षीय मुलगी बचावली असून तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. मोठय़ा प्रयत्नानंतर ढिगा-याखाली अडकलेल्या या मुलीला बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले कर्नाटकचे मंत्री के जे जॉर्ज यांनी मुलीला राज्य सरकारने दत्तक घेतल्याचे घोषित करत तिचा सर्व खर्च करणार असल्याचे म्हटले. या घटनेतील जखमींचाही आकडा वाढू शकतो. दरम्यान, या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. जॉर्ज म्हणाले, या स्फोटातील मृतांच्या कुटुंबींयाना ५ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी हेही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकायार्चा आढावा घेतला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये या इमारतीत ५ जण राहत तर एक शेजारी राहणारा एक व्यक्ती आहे. स्फोटामागचे कारण जाणून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
[EPSB]
[/EPSB]