राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशींचा आधार घेऊन भटके-विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि इतर मागास वर्गातील (ओबीसी) काही जातींना आरक्षणाच्या लाभासाठी क्रिमिलेअरच्या अटीतून वगळण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.
मुंबई- राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशींचा आधार घेऊन भटके-विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि इतर मागास वर्गातील (ओबीसी) काही जातींना आरक्षणाच्या लाभासाठी क्रिमिलेअरच्या अटीतून वगळण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्यात काही राजकीयदृष्टय़ा प्रभावी असलेल्या जातींचा समावेश आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध समाज घटकांना खूश करण्याचा हा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतरच राज्य सरकारला त्याबाबत अंतिम निर्णय घेता येणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिका-याने दिली.
केंद्र सरकारने अलीकडेच ओबीसींमधील जातींना शिक्षणातील प्रवेश, अन्य आर्थिक सवलती आणि शासकीय सेवेतील नोक-यांमधील आरक्षणाच्या लाभासाठी वार्षिक उत्पन्नावर आधारीत क्रिमीलेअरची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. या निर्णयामुळे ओबीसी लाभार्थीची संख्या काही प्रमाणात वाढणार आहे. राज्यातील भाजप सरकारनेही आता त्यापुढे एक पाऊल टाकून, ओबीसी, एसबीसी व भटके-विमुक्तांमधील काही जातींना क्रिमिलेअरच्या अटीतून पूर्णपणे वगळण्याची भूमिका घेतली आहे.
त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला जात आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने विमुक्त जातीच्या यादीतील १४ जाती, भटक्या जमातीच्या यादीतील २३ जाती, तसेच ओबीसी व एसबीसीमधील काही जातींना क्रिमीलेअरच्या तत्वातून पूर्णपणे वगळ्याची शिफारस केली आहे. त्यावर नागरिकांकडून ५ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या जातींची शिफारस
ओबीसींमधील माळी, तेली, भंडारी, सोमवंशी पाठारे, कुंभार, कासार, नाभिक, भावसार, सुतार, शिंपी, तांडेल, खाटिक, कुरेशी, एसबीसीमधील गोवारी, गवारी, कोष्टी, हलबा कोष्टी, साळी, कोळी, मच्छीमार कोळी, भटक्या-विमुक्तांमधील धनगर, लोहार, बेलदार, गोंधळी, भोई, कोल्हाटी, वैदू, मुस्लिम मदारी, हलालखोर, गोपाळ, वंजारा, बंजारा, बेरड, भामटा, कैकाडी, वडार, पारधी इत्यादी जातींना क्रिमिलेअच्या अटीतून वगळता येऊ शकते.
[EPSB]
[/EPSB]