पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने मंगळवारी आपली अंतिम उमेदवार यादी जाहीर केली.
नवी दिल्ली- पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने मंगळवारी आपली अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत ११७ जागांपैकी शिल्लक ठेवलेल्या ३ जागांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यात इंद्रवीर सिंग बोलारिया, मंजू बन्सल आणि संजय तलवार यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्ष पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्व ११७ जागा लढणार असून नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले माजी क्रिकेटपटू व माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. मंगळवारी जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी इंद्रवीर सिंग बोलारिया अमृतसर दक्षिण येथून, मंजू बन्सल या मनसा येथून, तर संजय तलवार हे लुधियाना पूर्व येथून लढणार आहेत.
बोलारिया हे शिरोमणी अकाली दलाचे अमृतसर दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांनी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मंजू बन्सल या काँग्रेसचे माजी आमदार मंगतराय बन्सल यांच्या पत्नी असून संजय तलवार हे लुधियाना महापालिकेचे नगरसेवक आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग हे दोन ठिकाणांहून लढत असून लांबी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याविरोधात ते रिंगणात उतरले आहेत. शिवाय त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या पटियाला शहरमधूनही त्यांनी अर्ज भरला आहे.
तर लुधियानाचे तरुण खासदार असलेले रणवीत सिंग बिट्ट हे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्याविरोधात जलालाबाद येथून रिंगणात उतरले आहेत. यंदा पंजाबमध्ये आम आदमी पक्षानेही पूर्ण तयारीनिशी आव्हान दिले असून त्यामुळे काँग्रेस, शिरोमणी अकाली दल-भाजपा, आणि आप अशी तिरंगी लढत यंदा होणार आहे.