मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त स्वत: खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरले.
मुंबई- मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त स्वत: खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरले. पावसाने सोमवारपासून उघडीप घेतल्यानंतर प्रत्येक विभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे हाती घेतली आहेत. या सर्व ठिकाणच्या खड्डे बुजवण्याच्या कामावर खुद्द आयुक्त अजोय मेहता हे देखरेख ठेऊन होते.
मुंबईतील अनेक भागांमध्ये खड्डयांचे साम्राज्य पसरले असून पावसात नागरिकांना अधिक त्रास होऊ नये म्हणून याची विशेष काळजी घेण्याचे आदेश आयुक्त मेहता यांनी शनिवारी दिले होते. त्यानंतर सोमवारी मुंबईतील शहर व उपनगरांतील रस्त्यांवरील, चौकांमधील (जंक्शन) खड्डयांची मलमपट्टी करत ते दुरुस्त केले. त्यानंतर मंगळवारी आयुक्त मेहता यांनी शहर भागातील रस्त्यांवरील खड्डयांची स्वत: पाहणी करून खड्डे बुजवण्यात येणा-या कामाबाबतही मार्गदर्शन केले.
आयुक्तांनी ‘ए’ विभागातील रामजी कमानी मार्ग, जी/दक्षिण विभागातील गणपतराव कदम मार्ग, जी/उत्तर विभागातील शिवाजी पार्कमधील लेडी जमशेटजी मार्ग, राजा बढे चौक, एफ/उत्तर विभागातील फाईव्ह गार्डन, मंचरजी जोशी मार्ग आदी रस्त्यांवरील खड्डयांची तसेच त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी गणपत पाटील मार्गावर मनसेचे नगरसेवक संतोष धुरी आणि राजा बढे चौकांमध्ये मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे हे यावेळी उपस्थित होते. याशिवाय उपायुक्त रमेश पवार, रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता दराडे आदी उपस्थित होते.
मुंबईच्या रस्त्यांवर ५० खड्डे
दिवसभरात महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ३२० खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी २७० खड्डे बुजवण्यात आले असून ५० खड्डे बुजवले नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ८ विभाग कार्यालयांच्या हद्दीत एकही खड्डा शिल्लक नसल्याचाही दावा प्रशासनाने केला आहे.