झोपेत एका महिलेच्या नाकात घुसलेले झुरळ थेट डोक्यापर्यंत पोहोचल्याचा प्रकार चेन्नईत समोर आला आहे.
चेन्नई– झोपेत एका महिलेच्या नाकात घुसलेले झुरळ थेट डोक्यापर्यंत पोहोचल्याचा प्रकार चेन्नईत समोर आला आहे. डॉक्टरांनी मोठया शिताफीने हे झुरळ जिवंत बाहेर काढले असून या प्रकाराची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
चेन्नईत राहणारी ही ४२ वर्षीय महिला झोपलेली असताना तिच्या नाकातून एक झुरळ आत शिरले. त्यानंतर समोर समोर जात त्याने डोळय़ांच्या मागेपर्यंतचा पल्ला गाठला. सकाळी ही महिला उठल्यानंतर तिला डोळ्यांच्या मागे काहीतरी वळवळत असल्याचे जाणवले आणि प्रचंड वेदना होऊ लागल्या.
त्यामुळे तिने डॉक्टरांकडे धाव घेत तपासणी केली. मात्र डॉक्टरांनी नाक साफ करून तिला घरी पाठवले. यानंतरही त्रास कायम असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घेतली असता डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करून तिच्या डोक्यात झुरळ असल्याचे निदान केले. नाकातून घुसून कवटीच्या तळापर्यंत गेलेले हे झुरळ १२ तासांनंतरही जिवंत होते.
नियंत्रित दाबाच्या एअर प्रेशर उपकरणाने हे झुरळ डॉक्टरांनी बाहेर काढले. यानंतरही हे झुरळ जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या विचित्र प्रकाराची सध्या चर्चा सुरू आहे.