मुंबईतील मनोरा आमदार निवासमध्ये एका खोलीचे छत कोसळले. ही खोली बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मुंबई- मुंबईतील मनोरा आमदार निवासमध्ये एका खोलीचे छत कोसळले. ही खोली बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे मनोरा आमदार निवासाच्या दुरूस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दक्षिण मुंबईत विधान भवन परिसरात मनोरा आमदार निवास आहे. आमदार सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील रुम नंबर ११२ मध्ये राहतात. या खोलीतील अँटी चेंबरमधील छत पीओपीसहित कोसळले.
छत कोसळले त्यावेळी रुममध्ये कोणीही नव्हते. खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
दरम्यान, मनोरा आमदार निवास २० वर्षापुर्वी बांधण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनोरा आमदार निवासाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. या तपासणीनंतर इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती. यापूर्वीही आमदार निवासातील एका खोलीत छत कोसळले होते.