राजधानीतील महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरूच असून येथील बुराडी भागात एका २२ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून करण्यात आलेल्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/04/murder.jpg)
नवी दिल्ली- राजधानीतील महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरूच असून येथील बुराडी भागात एका २२ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून करण्यात आलेल्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता एका तरुण माथेफिरूने मागून येऊन तरुणीवर एक नाही, दोन नाही तब्बल तीस वार केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.
हा हल्ला एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेंद्र (३४) असे या माथेफिरू हल्लेखोराचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रने अनेकदा या तरुणीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिने प्रत्येक वेळी त्याला नकार दिला होता. या रागातूनच त्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
हत्या करण्यात आलेल्या या तरुणीचे नाव करुण (२२) असून ती शिक्षिका होती. कॉम्प्युटर सेंटर चालवणारा सुरेंद्र हा वर्षभर या तरुणीला त्रास देत होता.
तसेच या कॉम्प्युटर सेंटरमध्ये ही तरुणी काम करत होती असेही सांगितले जात आहे. करुणाच्या कुटुंबीयांनी चार-पाच महिन्यांपूर्वी हा तरुण त्रास देत असल्याची पोलिसात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगितले. यावर या माथेफिरूने जीवे मारण्याची धमकी दिली होती असे सांगितले जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा हल्लेखोर या तरुणीवर एकामागोमाग चाकूने वार करत असल्याचे, तसेच ती मेली की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्याने तिचा देह सरळ करून पाहिला. तरुणीचा मृतदेह रस्त्यावर पडलेला असताना तिचे डोळे काढण्याचाही प्रयत्न या माथेफिरूने केल्याचे दिसून येते. प्रत्यक्षदर्शी मनीष कुमारनेच रस्त्यावर पडलेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले होते. त्याने सांगितले की, मी १०० नंबरला फोन केला, परंतु पोलीस आले नाहीत. रुग्णवाहिनीलाही फोन केला. तिथूनही मदत मिळाली नसल्याचे मनीषने सांगितले.