अनधिकृत झोपडयांचे इमल्यांवर इमले रचणा-या वांद्रे पूर्व बेहारामपाडा परिसरात चार मजली झोपडीचे बांधकाम कोसळून सहा मुलांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
![संग्रहीत छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2016/04/fire-in-temple3.jpg)
मुंबई- अनधिकृत झोपडयांचे इमल्यांवर इमले रचणा-या वांद्रे पूर्व बेहारामपाडा परिसरात चार मजली झोपडीचे बांधकाम कोसळून सहा मुलांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत.
गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये आयेश अकबर खान (१२), अली निसार अहमद खान (३), ओसामा निसार खान (१४), आफिफा सादाब (१), अरीबी सदर निसार खान (२), रूसदा निसार अहमद खान (१६) यांचा समावेश आहे.
बेहरामपाडयात दाटीवाटीने झोपडया असल्याने अग्निशमन दल व पालिका अधिका-यांना मदतकार्यात अडचणी येत होत्या. दुपारी दीड वाजता घटना घडल्यानंतरही पाच वाजेपर्यंत ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते, रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. आणखी काही जण ढिगा-याखालील अडकल्याची शक्यता आहे.
बेहरामपाडयात चार मजली झोपडी कोसळून दुर्घटना घडल्याची वर्दी दुपारी मिळताच अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर ढिगारा उपसण्यासाठी २ जेसीबी व ३० कामगारांची मदत घेण्यात आली. परंतु दाटीवाटीने ही वस्ती असल्याने लोखंडी बिम तसेच पत्रे कापून तसेच डेब्रीज उचलण्याच्या कामात अडचणी येत होत्या.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत ११ जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा मुलांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे महापालिका आपत्कालीन विभागाने सांगितले. दरम्यान दुर्घटनाग्रस्त झोपडीशेजारील चार झोपडया रिकाम्या करण्यात आल्याचे एच/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.