स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पास मंजूरी दिल्यानंतर हा अर्थसंकल्प मासिक सभेच्या मंजुरीसाठी स्थायी समिती सभापतींनी नगरसेवकांसमोर सभागृहात सादर केला.
नवी मुंबई- स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पास मंजूरी दिल्यानंतर हा अर्थसंकल्प मासिक सभेच्या मंजुरीसाठी स्थायी समिती सभापतींनी नगरसेवकांसमोर सभागृहात सादर केला. यावेळी शिवसेनेतील अंतर्गत कलह सभागृहात चव्हाटयावर आल्याने शिवसेनेतील गटबाजी समोर आली आहे.
या विरोधात आता थेट ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा देऊन राजीनामा देण्याची धमकी शिवसेनेचे पक्ष प्रतोद द्वारकानाथ भोईर यांनी दिल्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये दोन गट कार्यरत झाले आहेत, ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे.
नवी मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असतानादेखील संख्याबळाचे गणित जुळवून शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांची स्थायी समितीपदी वर्णी लागली आहे. शिवराम पाटील यांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करताना या अर्थसंकल्पासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, सभागृह नेता जयवंत सुतार, शिवसेना उपनेते विजय नाहटा व पक्ष प्रतोद द्वारकानाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख त्यांच्या निवेदनात केला.
मात्र यामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मनपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे नाव घेण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले. हे छापील निवेदन अर्थसंकल्प सादर करताना ही बाब गटनेते द्वारकानाथ भोईर यांच्या निदर्शनास आल्यावर भोईर आणि स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांची शाब्दिक जुगलबंदी चांगलीच जुंपली.
शिवसेनेची शिस्त मोडीत काढत विरोधी पक्षनेत्यांचे नाव या निवेदनात मुद्दाम गाळण्यात आल्याचा आरोप करत तुम्ही राष्ट्रवादीचे काम करताय का, असा सवाल विचारात या विरोधात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भोईर यांनी दिला.
याचबरोबर राजीनामा देण्याचा इशारादेखील दिला. ही जुगलबंदी सुरू असताना स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी माईक सुरू ठेवत संभाषण सुरू ठेवल्याबद्दल शिवसेना नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतील ही अंतर्गत धुसफूस चव्हाटयावर आली असताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नगरसेवकांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.
विशेष म्हणजे या वादानंतर स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले एकाच बाकावर शेजारी बसून देखील एकमेकांशी बोलण्याचे टाळत होते. आता या वादाची दखल शिवसेनेचे नेते कशी घेतात याकडे लक्ष लागले आहे.
स्थायी समिती सभापतींची आयुक्तांवर टीका
सभागृहात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शिवराम पाटील यांनी टीका केली. मुंढे यांच्याकडून नियमबा पद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याचा उल्लेख केला. कोणतीही करवाढ न करता मासिक सभेमध्ये २ हजार ९३४ कोटी २९ लाख ९० हजार रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला.
आयुक्तांनी मात्र आपण सादर केलेल्या अर्थसंकल्पावर ठाम असल्याचा उल्लेख केला होता. यावर शिवराम पाटील यांनी टीका करत हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी सभागृहात मांडला आहे. यावर चर्चा करून या अर्थसंकल्पाला मंजूरी मिळणार आहे.