मुंबईच्या समुद्रातील बुचर बेटावरील मरिन ऑइल टर्मिनल (जवाहर द्वीप) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल)च्या डिझेलच्या साठय़ाला शुक्रवारी लागलेली आग शनिवारी रात्रीपर्यंत धुमसत असली तरी ही आग नियंत्रणात असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अग्निशमन विभागाने सांगितले आहे.
मुंबई- मुंबईच्या समुद्रातील बुचर बेटावरील मरिन ऑइल टर्मिनल (जवाहर द्वीप) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल)च्या डिझेलच्या साठय़ाला शुक्रवारी लागलेली आग शनिवारी रात्रीपर्यंत धुमसत असली तरी ही आग नियंत्रणात असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अग्निशमन विभागाने सांगितले आहे. या आगीच्या दाहकतेने बेटावरील उर्वरित जवळपास १७ डिझेलच्या टाक्या थंड राहाव्यात यासाठी अग्निशमन दल सध्या प्रयत्नशील आहे.
घारापुरी लेण्यांच्या समोर असणा-या बुचर बेटावरील एका डिझेलच्या टाकीला वीज पडल्याने शुक्रवारी संध्याकाळी आग लागली होती. या टाकीमध्ये सुमारे ३० हजार मेट्रिक टन डिझेल होते. या घटनेला तब्बल २४ तास उलटून गेले तरी ही आग शनिवारी रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. ही आग नियंत्रणात असली तरी आगीच्या दाहकतेने इतर डिझेलच्या टाक्या पेट घेऊ नयेत यासाठी त्या थंड राहण्याची काळजी अग्निशमन दलाकडून घेतली जात आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शुक्रवारपासून तब्बल मुंबई पोर्ट ट्रस्ट व स्थानिक अग्निशमन दलाचे असे मिळून ५० कर्मचारी कार्यरत आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अग्निशमन विभागाने दिली आहे.
बुचर आयलंड या बेटावरील बीपीसीएलच्या तेलटाक्यांमधील आगीत २५ हजार किलो लिटर डिझेल बेचिराख झाले. बुचर आयलंड म्हणजेच जवाहर दीप या नावाने ओळखले जाणारे हे तेलसाठा टर्मिनल मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत असून तेथे भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) कंपनीच्या तेलटाक्या आहेत. येथे आणलेले डिझेल समुद्राखालील तेलवाहिनीतून माहुल परिसरातील कारखान्यांकडे जाते.
[EPSB]
कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेतून मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.
[/EPSB]