बॉम्बे व मद्रास हायकोर्टाचे नामांतर करण्याची अनेक वर्षाची मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे.
नवी दिल्ली- बॉम्बे व मद्रास हायकोर्टाचे नामांतर करण्याची अनेक वर्षाची मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. बॉम्बेचे मुंबई व मद्रासचे चेन्नई उच्च न्यायालय असे नामांतर होणार आहे. या नामांतराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.
केंद्रीय कायदा खात्याने या दोन्ही न्यायालयाच्या नामांतराचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी उच्च न्यायालय विधेयक २०१६ कायदा व न्यायखात्याला तयार करावे लागले. कारण ही दोन्ही न्यायालये भारतीय उच्च न्यायालय कायदा १८६१ अंतर्गत स्थापित झालेली आहेत.
या दोन्ही न्यायालयांचे नामांतर करण्यासाठी कोणताही केंद्रीय कायदा अस्तित्वात नव्हता. त्यासाठी नवीन कायदा तयार करावा लागला, अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली. कलकत्ता उच्च न्यायालयाचेही कोलकाता उच्च न्यायालय असे नामकरण लवकरच केले जाईल, असे त्यांनी सांगितले.