मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच भ्रष्टाचारी शिवसेना-भाजपाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर धडक देण्यात आली.
मुंबई- मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच भ्रष्टाचारी शिवसेना-भाजपाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर धडक देण्यात आली. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांवर एकाच वेळी मोर्चा काढून भ्रष्टाचाराच्या विरोधात घोषणा देऊन मुंबई दणाणून सोडली.
सर्व विभाग कार्यालयांवर हे आंदोलन करून एकप्रकारे महापालिकेत मागील २५ वर्षापासून सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपाच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचण्यात आला. जोपर्यंत जनतेचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसची ही भ्रष्टाचारविरोधी आंदोलने सुरूच राहतील, असे ठणकावून सांगितले.
शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या वतीने २४ विभाग कार्यालयांमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. प्रत्येक विभागातील स्थानिक आमदार, माजी आमदार, नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कुर्ला एल विभाग कार्यालयावरील मोर्चा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि आमदार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी बोलताना निरुपम यांनी युतीचा समाचार घेत २५ वष्रे ते सत्तेवर आहेत. पण ते चांगले रस्ते देऊ शकले नाहीत, शुद्ध पाणी देऊ शकले नाहीत, असे सांगत ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. मग पैसा जातो कुठे, असा सवाल केला.
रस्ते असो नाले सफाईतील यांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी सत्ताधा-यांना त्यांची जागा दाखवणे हे जनतेच्या हातात आहे. येणा-या २०१७च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी युतीला त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. त्यांना त्यांच्या खुर्चीतून बाहेर फेकून द्यायला हवे, असे निरुपम यांनी सांगितले.
यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला विभाग कार्यालयांवर मोर्चा
‘बी’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व आमदार अमिन पटेल, ‘डी’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे, ‘ई’ मनपा विभाग कार्यालय :
नेतृत्व माजी आमदार मधू चव्हाण, ‘एफ /उत्तर’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व जिल्हा अध्यक्ष हुकूमराज मेहता, ‘एफ/ दक्षिण’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व आमदार कालिदास कोळंबकर, ‘जी/उत्तर’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व आमदार वर्षा गायकवाड, ‘पी उत्तर’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व आमदार अस्लम शेख, ‘के/पश्चिम’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व माजी आमदार बलदेव खोसा आणि अशोक जाधव, ‘एच /पश्चिम’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व बाबा सिद्दिकी, ‘के /पूर्व’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व माजी मंत्री सुरेश शेट्टी, ‘एच/ पूर्व मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व माजी मंत्री कृपाशंकर सिंग, ‘आर/ मध्य मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व सरचिटणीस भूषण पाटील, नगरसेवक शिवानंद शेट्टी, ‘आर/ उत्तर मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व सरचिटणीस संदेश कोंडविलकर, ‘आर /दक्षिण मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर, ‘एल’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व आमदार नसीम खान, ‘एन’ मनपा विभाग कार्यालय: नेतृत्व महापालिका विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा.
‘टी’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व माजी आमदार चरणसिंग सप्रा, ‘एम/पश्चिम’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व माजी आमदार चंद्रकांत हंडोरे, ‘एस’ मनपा विभाग कार्यालय : नेतृत्व माजी आमदार शाम सावंत.