भाजप पदाधिका-याची शिवसेनेत कोलांटउडी!

0
360

प्रहार वेब टीम

पनवेल : पनवेल तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज शिवसेनेचे शिवबंधन बांधले. कोलांटउडी मारण्यात तरबेज असलेल्या शेवाळे यांचा मागील काही वर्षातला हा तिसरा राजकीय पक्षप्रवेश आहे. त्यामुळे शेवाळे शिवसेनेशी तरी निष्ठावान राहणार का, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रेरणेने राजकारणात आलेले रामदास शेवाळे हे सुनील तटकरेंचे खास मानले जात होते. कळंबोली भागात शेवाळेंनी हजारो कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून वारंवार रामदास शेवाळे यांना डावलले जात होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्धार केला. भाजपात धूमधडाक्यात प्रवेश करून पनवेल तालुक्याचे उपाध्यक्ष पदही मिळविले. मराठा आरक्षण क्रांती मोर्चाचे शेवाळे मराठा समन्वय संघटक असल्याने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या.

फडणवीस यांनी आश्वासन देऊन सुद्धा मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नसल्याने शेवाळे नाराज झाले होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेना भवनात पार पडलेल्या पक्ष प्रवेशावेळी आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील उपस्थित होते.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेवाळे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यानच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेवाळे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here