भिवंडी महानगरपालिकेचा ढासळलेला आर्थिक डोलारा सुधारण्यासाठी सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना भिवंडी महापालिकेचे आयुक्त म्हणून पाठवले.
भिवंडी- भिवंडी महानगरपालिका स्थायी समितीस प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेस आयुक्तांसह अधिकारी तब्बल अर्धा तास वाट बघून सुद्धा न आल्याने स्थायी समिती सभापती इम्रान वली खानसह उपस्थित सदस्यांनी प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करीत सभात्याग केला.
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रशासन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी नक्की कोणाची वाट पाहत होते, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, दरवर्षी महापालिका आयुक्त स्थायी समितीत अर्थसंकल्प सादर करतात नंतर तो महासभेकडे मंजूरीसाठी जातो.
भिवंडी महानगरपालिकेचा ढासळलेला आर्थिक डोलारा सुधारण्यासाठी सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना भिवंडी महापालिकेचे आयुक्त म्हणून पाठवले. त्यातच महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या महिन्याभरात जाहीर होणार असल्याने स्थायी समिती सभापती इम्रान वली खान यांनी आयुक्तांना २९ डिसेंबर २०१६ रोजी पत्र देऊन स्थायी समितीस जानेवारी अखेरपर्यंत अर्थसंकल्प सादर करावा. जेणेकरून त्यावर विचारविनिमय करण्यास वेळ मिळेल, असे कळविले. पण त्यास प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने खान यांनी विशेष सभेचे आयोजन करून अर्थसंकल्प मांडण्यासाठीची तयारी केली. पण महापालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी अर्धा तासाहून अधिक वेळ वाट पाहून न आल्याने स्थायी समिती सदस्यांनी सभात्याग केला.
प्रशासन सत्ता हाती ठेऊ पाहतेय
भिवंडी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असताना जाणूनबुजून अर्थसंकल्प सादर करण्यास विलंब करत आहे. आयुक्त व प्रशासन ऐन निवडणुकीच्या वेळी महानगरपालिकेची आर्थिक सत्ता आपल्या हाती ठेवू पाहात असल्याने हा डाव प्रशासनाकडून टाकला असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य कमलाकर पाटील यांनी केला आहे.
आयुक्तांनी पत्रकारांना टाळले
या प्रकरणी आयुक्त डॉ योगेश म्हसे यांची भेट घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. पण त्यांना एक तास थांबवून ठेवून आतील दालनात बैठक सुरू असल्याचे कारण देत भेटण्याचे टाळले.