पुढील वर्षी होणा-या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात कपात करण्यात आली असून आता तीन कसोटीसह सहा वनडे आणि तीन आंतरराष्ट्रीय टी-२० असा सुधारित दौरा असेल.
जोहान्सबर्ग- पुढील वर्षी होणा-या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात कपात करण्यात आली. पाहुणा संघ आता चारऐवजी तीन सामने खेळेल. एक कसोटी सामना रद्द करताना एका वनडे सामन्याची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे तीन कसोटीसह सहा वनडे आणि तीन आंतरराष्ट्रीय टी-२० असा सुधारित दौरा असेल.
दौ-यातील बदललेल्या वेळापत्रकाची घोषणा दक्षिण आफ्रिका बोर्डाचे सीईओ हरून लोरगट यांनी बुधवारी केली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला ५ जानेवारी २०१८पासून न्यूलँड्स (केपटाऊन) कसोटीने सुरुवात होईल. कसोटी मालिकेनंतर वनडे आणि टी-२० मालिका होतील.
भारताचा संघ श्रीलंका दौरा आटोपून २८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेत पोहोचेल. त्यानंतर दोन दिवसीय सराव सामना खेळेल. हा सामना ३० आणि ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान पर्लमध्ये होईल. वास्तविक पाहता इतक्या मोठय़ा दौ-यापूर्वी किमान दोन सराव सामन्यांची मागणी बीसीसीआयने घेतली होती. मात्र दोन दौ-यांदरम्यान पुरेसा कालावधी नसल्याने एकच सराव सामना खेळवला जाईल.
कसोटी मालिकेसाठी केपटाऊन ठिकाण निश्चित झाले आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी किंग्जमीड (डर्बन), वाँडर्स (जोहान्सबर्ग) आणि सुपर स्पोर्ट पार्क (सेंच्युरियन) या ठिकाणांमध्ये चुरस आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांची ‘डे-नाईट’ कसोटी खेळण्यासाठी यजमान उत्सुक
भारताविरुद्धच्या एका सामन्यात कपात करून झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांची दिवस-रात्र (डे-नाईट) कसोटी खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका उत्सुक आहे. ‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणून प्रचलित असलेली ही कसोटी २६ डिसेंबर २०१७पासून खेळली जाईल.
मात्र या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आयसीसीकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये ऑकलंडला होणा-या आयसीसीच्या बैठकीदरम्यान मान्यता मिळेल, असा विश्वास दक्षिण आफ्रिका बोर्डाला वाटतो. २००४-०५नंतर झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिकेत कसोटी खेळलेला नाही.