सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू युवराज सिंगने २७ चेंडूंत ६२ धावा फटकावताना आयपीएलच्या दहाव्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली.
हैदराबाद- सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू युवराज सिंगने २७ चेंडूंत ६२ धावा फटकावताना आयपीएलच्या दहाव्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली. त्याने अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतकी मजल मारली. युवराजचे आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठरले.
नाणेफेक जिंकून बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अष्टपैलू युवराज सिंगसह (२७ चेंडूंत ६२ धावा) मॉईझेस हेन्रिक्स (३७ चेंडूंत ५२ धावा) आणि सलामीवीर शिखर धवनच्या (३१ चेंडूंत ४० धावा) फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्सनी २० षटकांत ४ बाद २०७ धावा केल्या.
चांगली धावसंख्या उभारली तरी यजमानांची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (८ चेंडूंत १४ धावा) लवकर बाद करण्यात मध्यमगती गोलंदाज अनिकेत चौधरीला यश आले. मात्र हेन्रिक्सने धवन आणि युवराजसह दोन अर्धशतकी भागीदा-या करताना हैदराबादला मोठी धावसंख्या रचून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
हेन्रिक्सने धवनसह दुस-या विकेटसाठी ८.५ षटकांत ७४ धावा जोडल्या. त्यानंतर तिस-या विकेटसाठी युवराजसह अवघ्या ४.५ षटकांत ५८ धावांची झटपट भागीदारी केली. या दोन भागीदा-यांमुळे यजमानांना दोनशेपार मजल मारता आली. युवराजने २३ चेंडूंत अर्धशतकी मजल मारली.
आयपीएलमधील त्याचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. युवराजने २७ चेंडूंत नाबाद ६२ धावा फटकावताना नव्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. हैदराबाद संघातर्फे १७ चौकार आणि ९ षटकार लगावण्यात आले. म्हणजे २०७पैकी १२२ धावा ‘बाऊंड्री’ स्वरुपातील आहेत.