पुण्यातील एमआयडीसी परिसरात एका महिलेने चार वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पुणे- पुण्यातील एमआयडीसी परिसरात एका महिलेने चार वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
देवश्री इसप्पन (४ ) कौमदी इस्सपन (२५) असे या माय-लेकींची नावे आहेत.
इस्सपन कुटुंबीय मुळचे तमिळनाडूचे आहेत. कैमुदी यांचे पती शंकर यांचा चाकण एमआयडीसी येथे उद्योग आहे. बुधवारी सकाळी कौमदीचा पती कामावर गेल्यावर तिने देवश्रीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
कौमदीसोबत तिचा मावस भाऊ तसेच शेजारीच नातेवाईकही राहतात. कौमदीचा पती कामाला निघून गेल्यावर कौमदी मुलीला शाळेत सोडायला निघते. मात्र बुधवारी सकाळी नऊ वाजले तरी कौमदी मुलीला घेऊन बाहेर आली नाही म्हणून चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.
कौमदी आणि तिचे पती यांच्यात कौटुंबिक वाद होते. त्यामुळे कौमुदी या माहेरी निघून गेल्या होत्या. काही दिवसांपुर्वीच त्या पतीच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे कौमुदी यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.