प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर शनिवारी रात्री नागपुरातील सभेत एका कार्यकर्त्यांने शाई फेकली. श्रोत्यांतून अंडय़ांचा मारा झाला.
नागपूर- प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर शनिवारी रात्री नागपुरातील सभेत एका कार्यकर्त्यांने शाई फेकली. श्रोत्यांतून अंडय़ांचा मारा झाला. नागपूरच्या काँग्रेसच्या नेत्यांमधल्या अंतर्गत वादातून हा स्फोट झाला. पण उघडपणे हे बोलायला काँग्रेसचा कुणीही नेता तयार नाही.
भाजपा व असंतुष्टांकडून हा प्रयत्न झाला असावा, असे नेते सांगत आहेत. महापालिका निवडणूक काही दिवसांवर आली असताना घडलेल्या या प्रकाराने काँग्रेसच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडण्याची ही सभा पूर्व नागपुरातील हसनबाग चौकात आयोजिण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, नसीम खान, भाई जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. नसीम खान यांचे भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता व्यासपीठावर आला आणि त्याने खिशातील बाटली काढून अशोक चव्हाण यांच्या अंगावर ओतली. काय घडले हे लक्षात येताच मंचावरील कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला खेचून धुलाई सुरू केली.
पोलिसांनी त्याला मोठय़ा मुश्किलीने वाचवून रुग्णालयात नेले. व्यासपीठावर पळापळ आणि गोंधळ सुरू असताना अशोक चव्हाण खाली उतरून शर्ट बदलून आले. नंतर त्यांनी केलेल्या भाषणात भाषणात संघ आणि भाजपाला टार्गेट केले. ‘शाईफेकीमागे संघ-भाजप की पक्षांतर्गत वाद आहे याची आम्ही माहिती घेऊ ,’असे सांगून चव्हाण म्हणाले, ही सभा होऊ नये, असा संघ आणि भाजपाच्या नेत्यांचा प्रयत्न होता. त्यांना छुपी मदत करणारे काही लोक आहेत. अशा प्रवृत्तींना आम्ही घाबरत नाही.
शाई फेकणारा ललित बघेले हा माथाडी कामगार युनियनचा नेता आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी या युनियनचे अध्यक्ष आहेत. या भागाचे एकेकाळी आमदार राहिलेले चतुर्वेदी या महत्त्वाच्या सभेला उपस्थित नव्हते, हे विशेष. नागपूर काँग्रेसमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आहे. प्रदेश अध्यक्षाची सभा उधळेपर्यंत असंतुष्टांची मजल गेली आहे. भाजपशी लढायचे सोडून काँग्रेसचे नेते आपसातच लढत असल्याचे चित्र आहे.
अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्र्याच्या सभेला त्या मानाने हवा तसा बंदोबस्त पोलिसांनी का दिला नाही, हे कोडे आहे. सभेत गडबड होऊ शकते, याचा अंदाजही पोलिसांना आला नाही, या बद्दल आश्चर्य व्यक्तहोत आहे.