मराठवाडयातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नांदेड- मराठवाडयातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दोघांनाही आपल्या जिल्ह्यावर वर्चस्व मिळवत संपूर्ण मराठवाडयावर आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि रावसाहेब दानवे दोघेही खासदार आहेत. राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. संपूर्ण मराठवाडयात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असतानाच; दोघांच्याही गृह जिल्ह्यांतही निवडणूक होत आहे. यापूर्वीच्या निवडणुकापर्यंत राज्यात व केंद्रात काँग्रेस सत्तेत होती. तर भाजपा विरोधकांच्या भूमिकेत होता. या वेळी चित्र बदलले आहे.
भाजपा दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे. तर काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. लोकसभा आणि विधान सभा निवडणुका वेगळ्या मुद्दयावर लढल्या जात असल्या तरी जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक मुद्दयावरच लढल्या जातात. त्यामुळे या निवडणुकात दोघांनाही आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे.
सत्ता अबाधित ठेवण्याचे आवाहन
सद्यस्थितीत नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. ६३ सदस्यांच्या परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक २५ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस- १८, शिवसेना- ९, भाजपा- ३, लोकभारती- १, शेकाप- १, अपक्ष- ३ असे बलाबल आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसची सत्ता आहे. अशोक चव्हाणांसमोर पहिले आव्हान परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापनेचे आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसची राज्यात सत्ता असूनही काँग्रेसला बहुमत मिळालेले नाही.
या वेळी सत्ता नसताना त्यांना बहुमत मिळवावे लागणार आहे. सद्यस्थितीत दोन्ही काँग्रेसची सत्ता असली तरी निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांना भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आव्हान उभे केले आहे. विधानसभेत सर्वाधिक चार आमदार शिवसेनेचे आहेत. काँग्रेसचे तीन आमदार आहेत.
राष्ट्रवादीचा एक व भाजपाचा एक आमदार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेससमोर स्वबळावर सत्ता स्थापनेचे आव्हान आहे. विधान परिषद, नगर पालिका निवडणुकात काँग्रेसला चांगले यश मिळाले. आता जिल्हा परिषदेत खरी परीक्षा आहे. कारण विधान परिषद, नगर पालिका या मर्यादित क्षेत्रापुरत्या निवडणुका होत्या.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागातील प्रत्येक मतदार मतदान करणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदार यात सहभागी होणार असल्याने जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व याचा निर्णय या निवडणुकीत लागणार आहे.
दानवेंचीही परीक्षा
खासदार रावसाहेब दानवे यांनाही या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याही जिल्ह्यात निवडणूक होत आहे. जालना जिल्हा परिषदेत सध्या भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. ५५ सदस्यांच्या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १६ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ भाजपा- १५ व शिवसेना- १५ सदस्य आहेत.
काँग्रेसचे केवळ ३ सदस्य आहेत. तर मनसेचा १ सदस्य आहे. उर्वरित अपक्ष सदस्य आहेत. या वेळी दानवेंना जालना जिल्हा परिषेदत स्वबळावर भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे आव्हान आहे. सध्या युतीची सत्ता असली तर सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे. त्यात भाजपा-सेनेचे संबंध मुंबई महापालिकेमुळे कमालीचे ताणले गेले आहेत.
नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपाला मराठवाडयात फारसे यश मिळालेले नाही. दानवे स्वत:ची जाफराबाद नगर पालिकाही भाजपाला मिळवून देऊ शकले नाहीत. त्याबद्दल त्यांना विरोधकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. आता हा डाग त्यांना धुऊन काढावा लागणार आहे. जालना जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता स्थापन करून त्यांना जिल्ह्यावर आपले वर्चस्व आहे, हे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.
मराठवाडा कोणाचा?
दोन्ही प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मराठवाडयाचे आहेत. मराठवाडयातील आठही जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे चव्हाण-दानवे यांना गृह जिल्ह्यांत सत्ता स्थापन करण्यासोबतच मराठवाडयातील जास्तीत जास्त जिल्हा परिषदांही आपल्या पक्षाच्या वर्चस्वाखाली आणण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर मराठवाडा कोणाच्या बाजूने याचा कौल जिल्हा परिषद निवडणुकीतून मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रदेशाध्यक्षांना आपले राजकीय जीवन पणाला लावून या निवडणुका जिंकाव्या लागणार आहेत. त्यात रावसाहेब दानवे यांची मुलगी या निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणात उतरल्याने त्यांना अधिकच ताकद लावावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत दानवे निवडून आले तर मोदी लाट असूनही अशोक चव्हाण निवडून आले. दोन भिन्न पक्षाच्या, विचाराच्या खासदारांची प्रदेशाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.