दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी कार गुरुवारी दुपारी सचिवालयाजवळून चोरी झाली. केजरीवाल यांच्याकडे निळ्या रंगाची वॅगन-आर कार होती.
दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी कार गुरुवारी दुपारी सचिवालयाजवळून चोरी झाली. केजरीवाल यांच्याकडे निळ्या रंगाची वॅगन-आर कार होती. दोन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेल्या केजरीवाल यांनी याच कारमधून सर्वाधिक प्रवास केला. दुस-यांदा मुख्यमंत्री होईपर्यंत ते ही कार वापरत होते. सध्या ते शासकीय वाहनाचा (इनोव्हा) वापर करत आहेत.
अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची व्हॅगनआर कार अनोखी आहे. केजरावाल यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले होते, तेव्हापासून ते या कारचा वापर करत होते. त्यांच्या अनेक ब-या-वाईट प्रसंगाची ही कार साक्षीदार होती. आम आदमी पार्टीच्या एका समर्थकाने २०१५ मध्ये दावा केला होता, की त्यांनी २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांना ही कार भेट दिली होती. जेव्हा पक्षात मतभेद झाले तेव्हा कुंदन शर्मा नावाच्या या व्यक्तीने कार परत मागितली होती. कुंदन सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.
आपने प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पक्षातून काढले, त्यामुळे कुंदन नाराज होते. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली होती. केजरीवाल प्रथम ४९ दिवस मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते हीच कार वापरत होते. त्यानंतर त्यांनी ही कार हरियाणाचे आपचे नेते नवीन जयहिंद यांना दिली होती. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान नवीन यांनी याच कारमधून रोहतकमध्ये पक्षाचा प्रचार केला होता.