भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून एनडीएमधील सर्व घटक पक्षांच्या खासदारांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून एनडीएमधील सर्व घटक पक्षांच्या खासदारांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी अमित शाह यांनी या स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आणि सत्ताधारी समाजवादी पक्षाचा दारुण परभाव केला. पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा या निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
शिवाय, भाजपाने सर्व राजकीय अंदाज मोडत विक्रमी जागा जिंकत उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली. त्यानंतर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. उत्तर प्रदेशातील भाजपाच्या या विजयाचं सेलिब्रेशन म्हणूनही या स्नेहभोजनाकडे पाहिले जात आहे.
येत्या जूनमध्ये विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. त्यावेळी राष्ट्रपतीपदासाठी कुणाचे नाव पुढे केले जाईल, याची चर्चाही राजकीय वतुर्ळात रंगू लागली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला एनडीएतील मित्रपक्षांची गरज भासणार आहे. या चर्चांचाही स्पर्श अमित शाह यांच्या स्नेहभोजनाला आहे.