गुजरातच्या दौ-यावर असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अहमदाबाद- गुजरातच्या दौ-यावर असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुजरातचा विकास पहायचा असेल तर त्यांनी इटलीचा चष्मा काढावा. त्याऐवजी राहुल यांनी गुजरातचा चष्मा लावावा, तरच विकास दिसेल, अशी खोचक टीका शहा यांनी केली.
अमित शहा यांनी पोरबंदरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. राहुल गांधी यांनी गेल्या आठवडय़ात गुजरातच्या दौ-यावर असताना विकास वेडा झाल्याची टीका केली होती. त्यापार्श्वभूमीवर शहा बोलत होते. राहुल यांना गुजरातची स्वप्ने येत असतील तर त्यांनी इटलीत जाऊ नये. पोरबंदरला यावे. गुजरातचा विकासच पहायचा असेल तर त्यांनी इटलीचा चष्मा काढावा. त्याऐवजी गुजरातचा चष्मा लावावा, तरच विकास दिसेल, असा टोलाही शहा यांनी लगावला आहे. आम्ही तीन वर्षाचा हिशोब देऊ, पण राहुल गांधी तीन पिढ्यांचा हिशोब देणार का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका होतील, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गुजरातमध्ये होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘गुजरात गौरव यात्रा’ सुरू केली आहे. रविवारी शहा यांनी पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या करमसद या गावी जाऊन या यात्रेला हिरवा झेंडा दाखविला होता. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे.
यावेळी १३८ सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन मार्गानी ही यात्रा चालेल. एका मार्गावरील यात्रेचे नेतृत्व गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल करतील, तर दुस-या मार्गावरील यात्रेचे नेतृत्व गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतूभाई वघानी करणार आहेत.