समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीच्या लढाईत आता पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलवरुन चढाओढ सुरू झाली आहे.
नवी दिल्ली- समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीच्या लढाईत आता पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलवरुन चढाओढ सुरू झाली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात उमेदवार यादीमुळे सुरू झालेल्या युद्धानंतर मागील दोन-तीन दिवसांत पक्षात अनेक मोठय़ा घडामोडी घडल्या असून या दोघांनीही आपापल्या उमेदवार याद्या कायम ठेवल्या आहेत. त्यातच अखिलेश समर्थकांनी रविवारी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली असून आता आगामी उत्तर प्रदेश विधासभा निवडणुकीत पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली ‘सायकल’ आपल्यालाच मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर मुलायम सिंह यांनी मात्र ‘सायकल’ आपलीच असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता सायकल कुणाची? लेकाची की बापाची? याकडे सा-या देशाचे लक्ष लागले आहे.
उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पक्षात मागील काही दिवसांपासून काका-पुतण्याच्या वादामुळे उभी फुट पडली आहे. समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल यादव तसेच मुलायम सिंह यांचे पुत्र व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात सुरू असलेल्या शितयुद्धाने आता महायुद्धाचे रुप घेतले आहे. मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यांच्या पसंतीच्या उमेदवारांना डावलत शिवपाल यादवांसह जाहीर केलेली ३२५ उमेदवारांची यादी, त्यानंतर अखिलेश यांनी जाहीर केलेली त्यांच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी, या पार्श्वभूमीवर झालेले अखिलेश आणि त्यांचे काका रामगोपाल यादव यांचे ६ वर्षासाठीचे निलंबन, मग अखिलेश यांनी पक्षाच्या २२९ पैकी २२० आमदारांच्या समर्थनासह केलेले शक्तीप्रदर्शन यानंतर अखेर मुलायम यांनी मुलासोबत जुळवून घेतले होते. मात्र त्यानंतर समाजवादीचे प्रदेश सचिव रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, तसेच अमर सिंह आणि शिवपाल सिंह यादव यांची पक्षातून हकालपट्टी असे निर्णय घेण्यात आले. शिवाय पक्षाचे चिन्ह ‘सायकल’ मिळवण्यासाठीही अखिलेश यांनी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे धास्तावलेल्या मुलायम यांच्या निर्देशांवरुन अमर सिंह आणि शिवपाल सिंह यांनी सोमवारी दिल्लीत धाव घेत निवडणूक आयोगाला ‘सायकल’ हे चिन्ह मुलायम सिंह यांनाच देण्याची मागणी केली. आगामी काळात हे युद्ध आणखी पेटणार, हे स्पष्ट झाले आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत मुलायम यांच्यासोबत!
दरम्यान, दिल्लीत आलेल्या शिवपाल सिंह यांना त्यांच्या हकालपट्टीबाबत विचारले असता, मी अखेरच्या श्वासापर्यंत ‘नेताजीं’सोबत राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर मी मुलायम सिंह यांच्यासोबत होतो आणि असेन, असे अमर सिंह म्हणाले. शिवाय मी आत्तापर्यंत हिरो होतो, आता मात्र व्हिलन असेन, असा इशारा त्यांनी अखिलेश यांना नाव न घेता दिला. अखिलेश यांच्या कृतीने आपल्याला काहीही फरक पडत नाही, मुलायम सिंह आपल्याविरोधात काही बोलले तर मात्र दु:ख होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.