समाजवादी पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असलेली ‘सायकल’ मिळवण्यासाठी पिता-पुत्रांत शह-काटशहाचे राजकारण सुरूच आहे.
नवी दिल्ली- समाजवादी पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असलेली ‘सायकल’ मिळवण्यासाठी पिता-पुत्रांत शह-काटशहाचे राजकारण सुरूच आहे. ‘मी, पक्षाचा प्रमुख असल्याने ‘सायकल’वर खरी दावेदारी आपलीच असल्याचे मुलायमसिंग यांनी सोमवारी निवडणूक आयोगाला सांगितले.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गटातर्फे रामगोपाल यादव यांनी ‘सायकल’वर आपली दावेदारी सांगताना उत्तर प्रदेश विधानसभेसाठी १७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्याआधी निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा, असे म्हटले आहे.
सोमवारी अमर सिंह व शिवपाल यादव यांच्यासह मुलायमसिंग यांनी निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठून पक्ष नेत्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. अखिलेश निवडणूक आयोगाची दिशाभूल करत असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी मुलायम यांनी केली.
रामगोपाल यादव यांनी भरवलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री अखिलेश यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ही निवड करण्याआधीच रामगोपाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या घटनेला अनुसरून हे अधिवेशन नव्हते. ते असंविधानिक आहे, असे मुलायम सिंग यादव यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.
मुलायमसिंग यांच्याकडून तलवार म्यान
एकमेकांवर राजकीय कुरघोडया करण्यात रमलेल्या समाजवादी पक्षात अद्याप सारे काही आलबेल सुरू आहे. पुत्राविरोधात जोरदार आघाडी उघडणा-या मुलायमसिंग यादव यांनी सोमवारी अचानक आपली तलवार म्यान करत समाजवादी पक्ष संघटित असून ‘हम साथ साथ है’चा नारा दिला आहे.
अखिलेश यादव हेच पुढचे मुख्यमंत्री असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पित्रा-पुत्रांत सोमवारी सकाळी भेट झाल्यानंतर मुलायमसिंग यांनी हा निर्णय जाहीर केला. पुढील महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक असल्याने मुलायम यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.