‘सायकल’ चिन्हावर आपली दावेदारी ठोकण्यासाठी यादव पिता-पुत्रांत जोरदार रस्सीखेच सुरूच असून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी गुरुवारी बंधू शिवपाल यादव यांच्यासह नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले.
लखनऊ- ‘सायकल’ चिन्हावर आपली दावेदारी ठोकण्यासाठी यादव पिता-पुत्रांत जोरदार रस्सीखेच सुरूच असून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी गुरुवारी बंधू शिवपाल यादव यांच्यासह नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले.
यावेळी निवडणूक आयुक्तालयाला कागदपत्रे सादर करताना ‘सायकल’वर आपला दावा सांगितला. दुसरीकडे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बाजूने समाजवादी पक्षातील २०० आमदार उभे असून अखिलेश यांना पाठिंबा देण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर त्यांनी स्वाक्ष-या केल्याचे बोलले जाते.
मुलायमसिंह समर्थकांपैकी काही विधानसभा आमदार, विधान परिषदेचे आमदार आणि खासदारांनीही प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे. मात्र स्वाक्षरी करणा-या सदस्यांची नेमकी संख्या उघड होत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अखिलेश समर्थकांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची निवड करताना मुलायमसिंह यांना मागदर्शकाच्या भूमिकेत बसवले तर शिवपाल यांची सपाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर ‘सायकल’साठी अखिलेश व मुलायमसिंह गटाकडून दावेदारी सुरू आहे. दोन पिता-पुत्रांत समेट घडवण्यासाठी प्रयत्न होत असले तरी ऐन निवडणुकीत ही आशा आता मावळल्याचे
चित्र आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०४ आमदारांचे बलाबल असून सपाचे २२९ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे प्रतिज्ञापत्राद्वारे पिता-पुत्रांना आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अखिलेश समर्थकांपैकी १०० आमदारांनी आधीच त्यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
तर अन्य काही जणांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, समाजवादी पक्षातील खासदार व अखिलेश समर्थक नरेश अग्रवाल यांनी पक्षातील विधानसभा व विधान परिषदेचे बहुतांश आमदार अखिलेशसोबत आहेत, असा दावा केला आहे.