जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील बिब्मर गली सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील बिब्मर गली सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी रेंजर्सने रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सांबामधील रामगडमध्ये बीएसएफच्या जवानांवर अचानक गोळीबार केला.
पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजुने बराचवेळ गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारतीय सीमारेषेवर कोणतेही नुकसान झाले नाही.
गोळीबाराच्या आडून पाकिस्तान कुपवाडा, माछिल, नौगांव सेक्टर, बांदीपुरा, बारामुल्ला आणि उरी सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती लष्कराच्या एका अधिका-याने दिली.
पाकिस्तानकडून सीमेवर केल्या जाणा-या गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे. घुसखोरी करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या ४ दिवसात उत्तरी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या १४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. तर या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे.