बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावर नवशा मारुतीजवळ मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
पुणे- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावर नवशा मारुतीजवळ मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. पाटे बिल्डरच्या सेया इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील काम सुरू असताना, ही घटना घडली. वर्षभरापूर्वी बालेवाडीत स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यातून बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेने काहीच धडा घेतला नसल्याचे या दुर्घटनेमुळे पुढे आले.
सिंहगड रस्त्यावरील याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत आणि जखमी सर्वच मजूर मूळचे झारखंडचे आहेत. या दुर्घटनेने बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील प्रदीप कोसुंबकर हेच आर्किटेक्ट बालेवाडी येथे झालेल्या पार्क एक्स्प्रेस या दुर्घटना झालेल्या इमारतीचेही आर्किटेक्ट होते.
बालेवाडी येथील दुर्घटनेत स्लॅब कोसळून नऊ मजूर ठार झाले होते. त्यावेळी कित्येक महिने फरार राहून बिल्डर आणि आर्किटेक्ट यांनी अटक टाळली होती. याही दुर्घटनेत मजुरांचीच चूक असल्याचे बिल्डरचे म्हणणे आहे. सुट्टी दिली असताना मजूर काम करत होते, असे बिल्डरच्या वतीने सांगण्यात आले.
बांधकाम साईटवर मजुरांच्या सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना केलेल्या नव्हत्या असा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे दिखाव्यापुरती कारवाई न करता बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. बिल्डर जेवढे या दुर्घटनेला जबाबदार आहेत, तेवढीच जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांचीही आहे. या ठिकाणी उपस्थित असूनही महापालिका अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. बालेवाडीतील दुर्घटनेनंतरही महापालिकेच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. असेच चालणार असेल तर अशा दुर्घटना टळणार कशा? असा सवाल उपस्थित केला जातो.
[EPSB]
[/EPSB]