बंगळूरूत भाजप कार्यालयासमोर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ११ पोलिस कर्मचा-यांसह १६ जण जखमी झाले.
बंगळूरू- बंगळूरूतील मल्लेश्वरम भागात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता स्फोट झाला. स्फोटामध्ये ११ पोलिस कर्मचा-यांसह १६ जण जखमी झाल्याचे समजते. स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांना आणि दुचाकींना आग लागली. या स्फोटात १५ मोटारसायकल आणि तीन चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी गाड्यांना लागलेली आग तातडीने आटोक्यात आणली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिस आयुक्त राघवेंद्र औरडकर आणि मदत व बचावकार्य पथकही तातडीने पोहचले.
हा स्फोट मारुती ओमनी गाडीत झाला असे काही जणांचे म्हणणे आहे. तर काहीजण भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या दुचाकीवर ही स्फोटके ठेवण्यात आली होती, असा पोलिसांना संशय आहे. हा बाँम्बस्फोट आहे की गाडीतील सिलिंडरचा स्फोट आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.
कर्नाटकमध्ये पाच मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. असे असताना हा स्फोट झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या स्फोटात भाजपा कार्यालयाबाहेर बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या कर्नाटक पोलिसांच्या दोन गाड्या, कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाची एक गाडीची हानी झाली आहे. घटनास्थळी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनआयए) पथक कसून तपासणी करत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करुनच हा बाँम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटात ११ पोलिस, तीन महिला आणि दोन पुरुष असे १६ जण जखमी झाले असून हा दहशतवादी हल्लाच असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. अशोक यांनी म्हटले आहे. दोन कारच्या मध्ये एका मोटरसायकलवर हा बाँम्ब ठेवला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे बंदोबस्तासाठी असलेल्या कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या गाडीला या स्फोटाची झळ पोहचल्याने ११ पोलिस जखमी झाल्याचे अशोक यांनी सांगितले. योगायोग म्हणजे, आयपीएल सामने चालू असताना तीन वर्षापूर्वी १७ एप्रिल २०१० रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवरही बाँम्बस्फोट झाला होता.
मात्र, तपास चालू आहे, येथील सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि घटनास्थळावर तपास केल्यानंतरच याचे नेमके कारण समजू शकेल, संपूर्ण तपास केल्यावरच हा स्फोट कसा झाला हे समजेल, असे कर्नाटक पोलिसांनी सांगितले.
[EPSB]
स्फोटाने बंगळूरु हादरले..
बंगळूरूतील मल्लेश्वरम भागात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता स्फोट झाला. स्फोटामध्ये आठ पोलिस कर्मचा-यांसह १६ जण जखमी झाले.. आयपीएल सामने चालू असतानाच तीन वर्षापूर्वी १७ एप्रिल २०१० रोजी चिन्नास्वामी स्टेडीयमवरही भीषण बाँम्बस्फोट झाला होता.
[/EPSB]
एनआयएचे पथक घटनास्थळी रवाना
नवी दिल्ली – बंगळूरु येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
एनआयचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून तपासामध्ये बंगळूर पोलिसांना मदत करणार आहेत. आम्ही कर्नाटक सरकारच्या सतत संपर्कात आहोत असे गृहखात्याचे सचिव आर.पी.सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले घटक नेमके कोणत्या स्वरुपाचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे एनआयएचे पथक या सर्व गोष्टींची पडताळणी करणार आहेत असेही सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, लोकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन गृहखात्याने केले आहे. दोन दिवसांपूर्वीच बोस्टनमध्ये झालेले बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद हा जागतिक स्तरावर विखुरलेला आहे आणि संपूर्ण जगाने या दहशतवादाविरुद्ध एकीने लढा देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये हाय अलर्ट
अहमदाबाद – बंगळूरु येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.
गुजरातमधील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण राज्यात बाहेरुन येणा-या लोकांची कसून तपासणी केली जात आहे, असे राज्य पोलिस अधिक्षक अमिताभ पाठक यांनी पत्रकारांना सांगितले.
त्याशिवाय रेल्वे,बस स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणीही पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली,मुंबईमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.