बोपण्णा – शरन दुहेरीच्या अंतिम फेरीत
पॅलेमबँग – भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैना तसेच प्रज्नेश गुनीस्वरन यांनी महिला आणि पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवले. पुरुष दुहेरीमध्ये अनुभवी रोहन बोपण्णा आणि दिविज शरन यांनी अंतिम फेरीत धडक मारली.
महिला एकेरीमध्ये अंकिताला उपांत्य फेरीत अव्वल मानांकित चीनच्या झांग शुइ हिच्याकडून ४-६, ६-७ असा पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे अंकिता हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दुस-यांदा आशियाई स्पर्धेत सहभागी होत तिने पदकाची कमाई केली. पुरुष एकेरीमध्ये प्रज्नेश गुनीस्वरन याने उपांत्य फेरी गाठताना कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने कोरियाच्या क्वॉन सुनवू याच्यावर ६-७, ६-४, ७-६ अशी मात केली.
पुरुष दुहेरीत बोपण्णा आणि दिविज शरन जोडीने उपांत्य फेरीत जपानच्या कॅइटो उइसुगी आणि शो शिमबुकुरो जोडीवर ४-६, ६-३, १०-८ असा विजय मिळवला.