मुंबईमधील जुन्या इमारती, जुन्या चाळीमध्ये कॉमन बाल्कनी असतेच. घरातल्या लोकांच्या सुखदु:खांच्या सा-याच प्रसंगांच्या या बाल्कनी साक्षीदार असतात. तिथे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचे वेगवेगळे मूड्स पाहायला मिळतात. बाल्कनीतच लोक आपले सगळे क्षण व्यतित करतात. काही मुलं बाल्कनीत अभ्यास करतात, तर काही मुलं, मुंबईत असलेल्या मैदानांच्या कमतरतेमुळे बाल्कनीलाच क्रिकेटचं मैदान बनवतात. सकाळच्या वेळी घाईत असलेला मुंबईकर सूर्याला नमस्कार करण्याआधी त्याला जल अर्पण करतो तो बाल्कनीतच. कोणी वयस्कर दुपारच्या फावल्या वेळात बाल्कनीत बसून वर्तमानपत्रामधील शब्दकोडी सोडवण्यात मग्न असतो. तर एक चिमुरडी आपल्या बाल्कनीत लावलेल्या कुंडीतील झाडांच्या छायेत अभ्यास करताना दिसते. हे सर्व मूड्स टेलिलेन्सने टिपताना मीही बाल्कनीतल्या अद्भुत विश्वात अलगद प्रवेश केला.