अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित पद्मावती चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणारा हा सिनेमा अनेक कारणांनी, विरोधामुळे चर्चेत राहिला. मात्र, यातल्या राणी पद्मावतीची अर्थातच दीपिकाची अन् तिच्या लूकचीच अधिक उत्सुकता चाहत्यांना आहे.
राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. विशेष म्हणजे पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. १ डिसेंबर २०१७ रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिस-यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. दीपिका पदुकोण पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारत असून शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.