डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
चंदिगड- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जगदिश सिंह यांनी सिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावत असताना रोहतक न्यायालयात फक्त सहाजण उपस्थित होते.
न्यायालयाने शुक्रवारी बाबा राम रहीमला बलात्कार प्रकऱणी दोषी ठरवले होते. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आले होते. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी न्यायालायने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावताना त्यांनी केलेल्या समाजसेवेचा विचार केला जावा अशी मागणी राम रहिम यांच्या वकिलाने न्यायालयात केली होती. तर सीबीआय न्यायालयाने रहिमला कमीत कमी १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केली होती. निकाल देण्यापुर्वी युक्तिवादासाठी न्यायालयाने दोन्ही पक्षांना १० मिनिटांचा वेळ दिला होता.
दरम्यान, राम रहीम न्यायालयाच्या खोलीमध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकेच नाही तर रडूही लागला होता. मला माफ करा, असे तो म्हणत होता.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर आता बाबा राम रहिम यांचे वकील उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज करू शकतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा हिंसाचार उसळू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंचकुला, सिरसा, मनेसर या शहरात लष्करास पाचारण करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या