आईनेच आंतरराष्ट्रीय स्विमर मुलाच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
पुणे- आईनेच आंतरराष्ट्रीय स्विमर मुलाच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ही घटना पुण्यातील गुरूवार पेठ परिसरात घडली.
हर्षवर्धन अजित चव्हाण (११) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तर अंजली चव्हाण (३२) असे त्या मुलाच्या आईचे नाव आहे. या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून मुलाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी मुलाचे वडील अजित चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन हा एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे. त्याचे वडील इस्टेट एजंट आहेत. आई उच्चशिक्षित असून, गृहिणी आहे. तो न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहावीत शिकतो. त्याने २०१५ मध्ये पोहण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. २०१६मध्ये रशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड झाली होती.
पोहण्याच्या सरावामुळे हर्षवर्धनचे अभ्यासात लक्ष लागत नसे. मुलगा अभ्यासाकडे लक्ष देत नसल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान होणार या चिंतेने त्याच्या आईला नैराश्य आले होते.
सोमवारी सकाळी हर्षवर्धनचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी तो आणि अंजली दोघेच घरी होते. त्या वेळी अंजली यांनी नैराश्यातून हर्षवर्धनच्या डोक्यात दगडी पाटा घातला. त्यानंतर स्वतः पाट्यावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला.
काही वेळाने हर्षवर्धनचे वडील घरी आले, तेव्हा त्यांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.