अमेरिकेमधील फोर्ट लॉडेर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले.
अमेरिका- अमेरिकेमधील फोर्ट लॉडेर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पाच जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अमेरिकेतील फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडेर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-२ च्या बॅगेज क्लेम परिसरात घडली.
इस्टर्बन सँटिआगो असे गोळीबार करणा-या व्यक्तीचे नाव असून तो एक मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारावेळी सर्व प्रवाशी टरमॅकमध्ये एकत्रित झाले होते. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने विमानतळ सील केले. गोळीबारानंतर विमानतळावरील सर्व व्यवहार तात्काळ थांबविण्यात आले आहेत. इस्टर्बन याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप स्थळी हलवण्यात आले.
इस्टर्बन सँटिआगो अमेरिकन सैनिक आहे. इस्टर्बन याने नोव्हेंबर महिन्यात त्याच्या मनाला नियंत्रित केले जात असल्याची माहिती एफबीआयला दिली होती. त्यानंतर इस्टर्बनला काही काळासाठी मनोरूग्णालयात पाठविण्यात आले होते.