पाकिस्तान शुक्रवारी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्येही अनेक ठिकाणी पाकिस्तानी झेंडे झळकत होते.
श्रीनगर- पाकिस्तान शुक्रवारी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्येही अनेक ठिकाणी पाकिस्तानी झेंडे झळकत होते. फुटीरतावादी नेत्या दुख्तरन-ए-मिल्लतच्या प्रमुख आसिया अंद्राबी यांनी पाकिस्तानचा झेंडा फडकवून पक्षाच्या कार्यकर्त्यांना या वेळी मार्गदर्शन केले.
या प्रकारामुळे जम्मू-काश्मीरमधील खानयार, नावहाटा, रैनवारी, एमआर गंज, मैसूमा, साफा कदाल या ठिकाणी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यापासून रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाइज उमर शेख यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याशिवाय सीआरपीएफ आणि पोलिसांच्या अतिरिक्त तुकडय़ाही विविध भागात तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
घराघरांवर तिरंगा लावण्याचा ‘फतवा’
फैजाबाद- भारताच्या स्वातंत्र्यदिनी सर्व मुस्लिमांनी आपल्या घरावर, व्यावसायिक ठिकाणी आणि मदरशांवर तिरंगा फडकवावा, असा फतवा दारुल उलूम देवबंद या संघटनेने काढला आहे. संघटनेचे नेते मौलाना अर्शद कासमी यांनी हा फतवा काढला आहे. शिवाय देशातील मुस्लिम नागरिकांनी देशभक्तीने हा दिवस साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अनेक मुस्लिम क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले प्राण पणाला लावले असून संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचे रुपांतर ज्या पूर्ण स्वराज्य चळवळीत झाले या चळवळीचा नारा हुसन अहमद मदानी आणि मौलवी अहमदुल्लाह शहा यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.