पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे.
मुंबई – पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे.पारसकर यांनी बलात्कार केल्याचे पिडीत तरुणीने आपल्याला कधी सांगितलेच नव्हते. हे सर्व तिने प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचा गौप्यस्फोट पिडीत तरुणीचे आधीचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला आहे.
माझ्या आणि पिडीत तरुणीदरम्यान एसएमएस आणि व्हॉटसअॅप मेसेसद्वारा झालेल्या संभाषणाचे पुरावे मी सादर केले आहेत. या मेसेजवरुन मॉडेलने पारसकरांवर केलेले आरोप केवळ रिअॅलिटी शोमध्ये सहभाग मिळावा यासाठी केल्याचे सिद्ध होईल असे सिद्दीकी यांनी सांगितले.
जुलैच्या दुस-या आठवड्यात पारसकरांना याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली असल्याचे सिद्दीकी म्हणाले. पारसकरांकडून आपल्यावर महागड्या वस्तू मिळवण्यासाठी दबाव येत असल्याची तक्रार यामध्ये करण्यात आली होती. मॉडेलचा हेतू समजल्यानंतर मात्र आपण मॉडेल तरुणीला साथ देण्यास नकार दिल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले.
दरम्यान, पिडीत तरुणीच्या सध्याच्या वकील चित्रा साळुंखे यांनी मॉडेलला लाच दिल्याचा आरोप सिद्दीकी यांच्यावर केला आहे. सिद्दीकी यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी मॉडेल तरुणीला पैशांची ऑफर दिली होती असा आरोप साळुंखे यांनी केला आहे.
नोव्हेंबर २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान पारस्कर यांनी आपल्यावर बलात्कार आणि विनयभंग केल्याची तक्रार २३ जुलैला या तरुणीने केली होती. त्यांनंतर पारसकर यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम ३७६(२), कलम ३७६ सी आणि कलम ३५४(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.